![]() |
| शासनाच्या योजनेचा लाभ मोफत देण्याबाबत स्पष्ट निर्देशत असतांनाही बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या किटसाठी काहींकडून घेण्यात येत आहे ५०० रूपये |
मलकापूर (प्रतिनिधी) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत मलकापूर शहरात नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या वतीने गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या बांधकाम कामगारांना या वस्तू मोफत देण्याबाबत स्पष्ट आदेश असतांनाही स्थानिक पातळीवर काहींकडून प्रत्येक किटमागे ५०० रूपयांची वसुली केली जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची अशाप्रकारे आर्थिक लुबाडणूक करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी काही बांधकाम कामगारांकडून केली गेली आहे.
इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या गृहपयोगी संचातील वस्तूमध्ये ताट ४, वाट्या,
पाण्याचे ग्लास ४, पातेले झाकणासह १, पातेले झाकणासह १, पातेले झाकणासह १ मोठा चमचा (भात वाटपाकरीता) १ मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) १, पाण्याचा जग ( २ लीटर) १, मसाला डब्बा (७ भाग) १, डब्बा झाकणासह (१४ इंच) १, डब्बा झाकणासह (१६ इंच) १, डब्बा झाकणासह (१८ इंच ) १, परात १, प्रेशर कुकर ५ लिटर (स्टेनलेस स्टील) १, कढई (स्टील) १, स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह १ अशा एकूण ३० वस्तू देण्यात येतात.
या योजनेच्या माध्यमातून मागील काही काळात शासनाच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार मलकापूर शहरातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली होती. त्यांना या वस्तुंचा आता देण्यात येत आहे. परंतु या योजनेच्या लाभ देतांना कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये म्हणजेच या योजनेचा लाभ हा मोफत देण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. तरी सुध्दा मलकापूर येथे वाटप करण्यात येत असलेल्या या किटच्या मोबदल्यात काहींकडून प्रति किट ५०० रूपये घेण्यात येत आहेत. त्यामुळे एक प्रकारे ही फसवणूकच केली जात आहे. तेव्हा याबाबत चौकशी करण्यात यावी व बांधकाम कामगाराची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी काही बांधकाम कामगारांनी केली आहे.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।