शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी  : जिल्हा प्रशासनाचे आवाहन


बुलडाणा, दि. 16 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासह अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे मिळणाऱ्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होणार नसल्याने शेतकऱ्यांनी प्राधान्याने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन‍ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.


जिल्ह्यात सध्यास्थितीमध्ये 94 हजार 628 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. यात बुलडाणा 10,454, चिखली 17,507, देऊळगाव राजा 7,894, सिंदखेड राजा 7,455, मेहकर 10,637, लोणार 11,463, मोताळा 2,493, मलकापूर 3,511, नांदुरा 6,271, खामगाव 1,772, शेगाव 2,772, जळगाव जामोद 5,897, संग्रामपूर 6,502 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित असलेली ईकेवायसी केल्यास त्यांच्या बॅंक खात्यात तातडीने मदतीची रक्कम जमा करण्यात येते.


जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 42 हजार 824 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यातील 8 लाख 24 हजार 831 शेतकऱ्यांची माहिती मंजूर करण्यात आली आहे. 2 लाख 36 हजार 277 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकी आहे. विविध योजनांतर्गत 7 लाख 16 हजार 830 शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत 94 हजार 628 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


ई-केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि महाऑनलाईन केंद्रांची यादी buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलबध आहे. यात बुलडाणा 94, चिखली 103, देऊळगाव राजा 50, सिंदखेड राजा 84, मेहकर 124, लोणार 63, मोताळा 83, मलकापूर 57, नांदुरा 73, खामगाव 119, शेगाव 58, जळगाव जामोद 50, संग्रामपूर 55 या केंद्रावर शेतकऱ्यांना ईकेवायसी करता येणार आहे.


शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून विविध योजनेत दिली जाणारी मदत, अनुदान ई-केवायसी प्रलंबित असल्याने ती मिळण्यास अडचण जाते. ही प्रक्रिया प्रलंबित असल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी अभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

दहिद येथे बीजोत्पादन कार्यक्रम

बुलडाणा, दि. 16 : कृषि संपन्न शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे दहिद खु. येथे बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.


माजी सरपंच प्रकाश कळवाघे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील श्री. सुरगडे उपस्थित होते. कलश सीड कंपनीचे रिजनल मॅनेजर अमोल शिंगणे यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री. अंभोरे यांनी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये सेंद्रीय अमृत शेतकरी उत्पादक कंपनी बुलढाणा, कृषि संपन्न शेतकरी उत्पादक कंपनी दहिद खु., जिजाऊ शेतकरी उत्पादक कंपनी अंभोडा, गोसंवर्धन शेतकरी उत्पादक कंपनी सोयगाव आदी कंपनीचे शेतकरी सभासद उपस्थित होते.


तालुका कृषी अधिकारी ए. टी. सुरडकर यांनी प्रास्तविक केले. गजानन इंगळे यांनी आभार मानले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक उपस्थित होते.

Tags:

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)