मतदार जागृतीसाठी खुली रांगोळी स्पर्धा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

 
मतदार जागृतीसाठी खुली रांगोळी स्पर्धा  लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन
मतदार जागृतीसाठी खुली रांगोळी स्पर्धा

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी दि. २६ एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यादृष्टीने मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने दि. 9 ते 14 एप्रिल दरम्यान खुली रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे.

मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे, ते पार पाडण्यासाठी त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन देशाचा गौरव वाढवावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकजागृती उपक्रम राबविल्या जात आहे. त्याच अनुषंगाने सर्वासाठी खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यापक सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने दिलेल्या विषयांचा आशय कलात्मकरित्या व्यक्त करण्यासाठी, तसेच नवसृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या रांगोळी स्पर्धेकरीता उत्सव लोकशाहीचा-देशाच्या अभिमानाचा, माझे मत-माझा अधिकार व मी मतदान करणार हे तीन विषय देण्यात आले आहेत. 

या स्पर्धेसाठी प्रशासनाकडून सर्वसाधारण नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहे. त्यामध्ये प्राधान्याने स्पर्धकांची रांगोळी ही विषयाला अनुसरून असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रांगोळी ही कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, विचार, चिन्ह अथवा राजकीय पक्षाचे उदात्तीकरण करणारी नसावी. तसे निदर्शनास आल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता स्पर्धेतील प्रवेश बाद ठरविण्यात येणार आहे. एका रांगोळीसाठी एकच स्पर्धक ग्राह्य समजल्या जाणार असून स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असणार आहे.

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या गुगल लिंकवर दोन छायाचित्र अपलोड करणे आवश्यक राहील. त्यापैकी एक छायाचित्र हे रांगोळी काढताना सहभागी स्पर्धकांचे तर दुसरे छायाचित्र हे पूर्णपणे रेखाटण्यात आलेल्या रांगोळीचे असणे अभिप्रेत आहे. या स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या परिक्षण समितीचा निर्णय अंतिम असणार आहे. तसेच स्पर्धकांनी सादर केलेले रांगोळीचे छायाचित्र सामाजिक जाणीव व जागृती, तसेच प्रचार व प्रसिद्धीसाठी विनामोबदला वापरण्याचे सर्वाधिकार प्रशासनाकडे राहणार आहेत.  

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क असणार नाही, तसेच एका स्पर्धकाची एकच प्रवेशिका मान्य राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या गुगल लिंकच्या माध्यमातूनच स्पर्धेसाठी नाव नोंदणी सहभागी होता येणार आहे. त्यासाठी दि. ९ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत स्पर्धकांनी आपला प्रवेश नोंदवून रांगोळीचे छायाचित्र अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यापूर्वीचे अथवा नंतरचे प्रवेश ग्राह्य समजण्यात येणार नाहीत.

स्पर्धेचा निकाल हा जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर केल्या जाणार आहे. गुणानुक्रम प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक संपर्क साधून कळविल्या जाणार आहे. सदर स्पर्धा ही सामाजिक जाणीव जागृतीसाठी असल्याने कुठल्याही रोख अथवा भेटवस्तू स्वरूपात पारितोषिक-पुरस्कार असणार नाही. तथापि सामाजिक योगदान व सृजनशीलतेचा गौरव म्हणून स्पर्धेतील उत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे.  

या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लोकोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)