बुलढाणा, दि. 16 : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गांधीभवन येथे वॉकेथॉन उत्साहात पार पडली. आमदार संजय गायकवाड यांनी वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आमदार संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे उपस्थित होते.
आमदार श्री. गायकवाड यांनी नागरिकांनी संवेदनशीलपणे वाहन चालवावे. अपघात झाला असल्यास यात जखमींना मदत करावी. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्यास त्या व्यक्तीला कुठल्याही कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागत नाही. तसेच रस्त्याने चालताना किंवा वाहन चालविताना नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. गायकवाड यांच्या हस्ते शेख मुज्जमत जब्बार, रा. मातणी आणि प्रेम वाकोडे रा. बेलोरा, पिंपळगाव राजा यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्याबद्दल हेल्मेट देऊन सन्मानित केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रास्ताविक केले. अनिल रिंढे यांनी सूत्रसंचालन केले.
या वॉकेथॉनमध्ये सहकार विद्या मंदिर, महात्मा फुले शाळा, शिवाजी विद्यालय, जिजामाता महाविद्यालय एनसीसी कॅडेट, सैनिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी यांच्यासह नागरीक सहभागी झाले. वॉकेथॉनच्या आयोजनासाठी सौरभ पवार, राजेंद्र निकम, विवेक भंडारे, सीमा खेते, नागनाथ महाजन, रितेश चौधरी, प्रतीक रोडे, स्वप्निल वानखेडे, भूषण खरतडे, अनुजा काळमेघ, सुरज कोल्हे, राजश्री चौधरी, प्रियंका काळे, सुरेखा सपकाळ, संतोष घ्याळ, गजानन तनपुरे यांनी पुढाकार घेतला.
आयटीआयमध्ये गुरुवारी रोजगार मेळावा
बुलडाणा, दि. 16 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरूवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात 13पेक्षा अधिक उद्योजकांनी त्यांच्याकडील 1 हजार 35 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केली आहे. या मेळाव्याद्वारे टाटा, व्हिल्स इंडिया लिमिटेड सारख्या नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांनी दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
पात्र, गरजू व नोकरी इच्छुक उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकतील. उमेदवारांनी उपस्थित राहुन नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.
मंगळवारपासून चिखलीत रंगणार महासंस्कृती महोत्सव
तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलन, लोककलांचा उत्सव
बुलडाणा, दि. 15 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने चिखली येथील तालुका क्रीडा संकुल येथे तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह कवी संमेलन, लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, ॲड. आकाश फुंडकर, राजेश एकडे, श्वेता महाले, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोज, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी उपस्थित राहतील.
चिखली येथे मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची मराठी, हिंदी गाणी सादर करतील. बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे कवी, हास्यकवी संमेलन होईल. त्यानंतर दीप्ती आहेर आणि समूह पारंपरिक लावणी सादर करतील. गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविनारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील. तसेच दि. 20 ते 22 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान येथे स्थानिक लोकांच्या कलागुणाचा प्रोत्साहनात्मक कार्यक्रम भजन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी बचतगटांच्या स्टॉल्सच्या खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन संस्कृतीचे आदान-प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांनी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।