महासंस्कृती महोत्सवात लोक कलेचा जागर *दंडार, गोंधळाला नागरिकांची पसंती * हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद * लावणीवर धरला ठेका

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

 

महासंस्कृती महोत्सवात लोक कलेचा जागर

*दंडार, गोंधळाला नागरिकांची पसंती

* हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद

* लावणीवर धरला ठेका



बुलडाणा, दि. 22 : महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी, दि. 22 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे हास्यकवी संमेलन पार पडले. दीप्ती आहेर आणि समूहानी पारंपरिक लावणी सादर केली. उपस्थितांनी पारंपरिक गोंधळ, दंडारला पसंती दिली. हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद दिली. तसेच लावणीवर ठेका धरला.

यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रम सादर करण्यात आला.

यात बुलडाणा येथील अंध निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. नंदकिशोर यांच्या समुहाने गोंधळ सादर केला. गणेश कदम यांनी वासुदेव, शाहिर हरिदास खाडेभराड यांनी शेतकरी आत्महत्या, प्रमोद दांडगे यांनी भारूड, पांडुरंग ढिलावी यांच्या समूहाने दंडार, मेहकर येथील आई लोककला समूहाने गोंधळ सादर केला.

हास्य कवी संमेलनात स्वाती सुरंगळीकर, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर, वृशाली देशपांडे, बंडा जोशी यांनी सहभागी होत हास्य कविता सादर केल्या. बंडा जोशी यांनी याड लागलं हे विडंबन सादर केले. भालचंद्र कोळपकर यांनी बायकोवर कविता सादर केली. स्वाती सुरंगळीकर यांनी मुलाच्या लग्नातील किस्सा सांगितला. अनिल दीक्षित यांनी नोटबंदीवर कविता सादर केली.

दीप्ती आहेर आणि समूहानी सुरवातीला गौळण आणि पाटलाचा वाडा लावणी सादर केली. त्यानंतर माधवी यांनी 'या रावजी बसा भावजी', बुगडी शोधायला आणि दीप्ती आहेर यांनी हा साजन माझा, चंद्रा लावणी सादर केली. कामिनी पुणेकर यांनी कुणी तरी न्या हो मला फिरवायला, जरा सरकून बसाया गाण्यावर लावणी सादर केली. महोत्सवातील लावणीच्या कार्यक्रमात शेवटी कामिनी पुणेकर, माधव आणि दिप्ती आहेर यांनी पाटलाचा वाडा या गाण्यावर लावणी सादर केली. दिप्ती आहेर यांनी स्टेजखाली उतरून उपस्थितांच्या मध्ये जाऊन नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांचा आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमस्थळी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रांचे दालन आणि पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहे. महासंस्कृती महोत्सवात शेवटच्या दिवशी गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील. महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)